रेणापूर : लोकनेते विलासराव देशमुख यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवरून रेणा व मांजरा परिवारातील सर्व कारखाने वाटचाल करीत आहेत. रेणा कारखान्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. लवकरच सोलर प्रकल्प, सीएनजी गॅस प्रकल्प उभारणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन रेणा कारखान्याचे संस्थापक आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले. रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १० टक्के बोनस आणि सभासदांनाही कमी दराने ५० किलो साखर देण्यात येईल, अशी घोषणा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली.
दिलीपराव देशमुख म्हणाले की, अल्पावधीतच कारखान्याने राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या हंगामात सुमारे सहा लाख टन ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे. साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या सभासदांना यावर्षीही जादा दर देण्याचा प्रयत्न आहे. आमदार धीरज देशमुख म्हणाले की, मांजरा परिवारातील कारखान्यांच्या सर्वसाधारण सभांमधून सभासदांचा विश्वास दिसतो. विचारांचे आदान-प्रदान सभांमधून होते. हे वेगळेपण येथेच आहे. त्यामुळे लातुरच्या सहकार क्षेत्राचे कौतुक केले जाते.
चेअरमन सर्जेराव मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, सभापती जगदीश बावणे, सुनील पडिले, गणपत बाजुळगे, श्याम भोसले, प्रमोद जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, विजय देशमुख, रेणाचे उपाध्यक्ष अनंत देशमुख, उमाकांत खलंग्रे आदी उपस्थित होते.