कोल्हापूर : येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे लिज युनिट असलेल्या श्री रेणुका शुगर्स लिमिटेडने यंदाच्या, सन २०२३-२४ गळीत हंगामातील ऊसाला विनाकपात ३,३०० रुपये प्रती टन असा उच्चांकी प्रतिटन दर जाहीर केला आहे. हा दर राज्यातील व कारखान्याच्या इतिहासातील उच्चांकी दर आहे, असे कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी सांगितले.
चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्याने दरवर्षी उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. चालू वर्षी गळीत हंगामाचा कालावधी कमी आहे. यंदा रेणुका शुगर्सने चालू गळीत हंगामात गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३३०० रुपये देण्यास मंजूरी दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे. श्री रेणूका शुगर्स लिमिटेडचे लिज युनिट असलेल्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ या चालू गळीत हंगामामध्ये येणा-या ऊसासाठी उच्चांकी, ३,३०० रुपये प्रती टन दर एकरकमी, विनाकपात देण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व ऊस पुरवठादार, शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे श्री रेणूका शुगर्स लि.च्या प्रशासनाने परिपत्रकात म्हटले आहे. पत्रकार परिषदेला रेणुका शुगर्सचे केन विभागाचे कार्यकारी संचालक एस. बी. नेर्लीकर, केन विभागाचे सीनिअर जनरल मॅनेजर मुगळखोड, डे. जनरल मॅनेजर सी. एस. पाटील, केन मॅनेजर एन. टी. बन्ने, संचालक धनगोंडा पाटील, एम. आर. पाटील, प्रमोद पाटील, प्र. का. संचालक नंदकुमार भोरे आदी उपस्थित होते.