नवी दिल्ली : चीनी मंडी
रेणुका शुगर्स ग्रुपवरील कर्जाचा ताण १८ डिसेंबरनंतर थोडा हलका होण्याची शक्यता आहे. रेणुका शुगर्सच्या ब्राझीलमधील रेवती पॉवर प्लँटचा येत्या १८ डिसेंबरला लिलाव होणार असून, त्यासाठी कोणतिही किमान रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. तीन वर्षांपासून अधिक काळ रेवती पॉवर प्लँट पुनर्बांधणीसाठी न्यायालयीन अधिपत्याखाली होता. अखेर रेणुका शुगर्सने हा प्लँट लिलावात काढला आहे.
कॅझारिन्को या कंपनीकडून रेणुका शुगर्सच्या लिलावाची माहिती समोर आली आहे. कॅझारिन्को जगभरात साखर आणि इथेनॉलचे मार्केटिंग करणारी मोठी कंपनी असून, रेणुका शुगर्सला त्यांच्या ब्राझीलमधील मालमत्तेची विक्री करण्यात सल्ला देण्याचे काम करत आहे.
रेवती हा ब्राझीलमधील साओ पावलो शहराजवळचा प्रकल्प असून, २६ सप्टेंबरनंतर ९० दिवसांत त्याचा लिलाव करणं गरजेचं आहे. यासाठी बंद पाकिटातून प्रस्ताव देण्यात आले आहेत. हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तीस दिवसांची मुदत आहे. या नोटीसमध्ये कोणत्याही प्रकारची किमान रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.
रेणुका शुगर्स यांचा बँका, पुरवठादार आणि इतर कर्जदारांची देणी ही अंदाजे एकूण देय रकमेच्या (तीनशे कोटी रुपये) सुमारे दहा टक्के होती. ही देणी भागवण्यात आली आणि त्याला न्यायालयाने मंजुरीही दिली. नॉर्थवेस्ट पौलिस्टा शुगरकेन सप्लायर्स असोसिएशन (एनओआरपीएलएएन) या संस्थेचे अध्यक्ष नेल्सन पेरीस यांनी सांगितले की, आम्ही चांगल्या प्रस्तावाचे खरेदीदार पुढे आणण्यास उत्सुक आहोत. अनेक विक्रेत्यांना याची गरज आहे.
या परिस्थितीत प्रकल्पाचा थेट लिलाव होईल किंवा एखाद्या समुहाशी थेट चर्चा होईल आणि प्रकल्पाची विक्री ही कर्जदारांच्या मंजुरीशी अधीन राहील, अशी शक्यता आहे.
रेणुका शुगर्सचा ब्राझीलमध्ये मधू ऑफ प्रोमीस्साओ हा ६० लाख टन क्षमतेचा दुसरा प्रकल्प आहे. रेवती प्रकल्पाच्या दुप्पट त्याची क्षमता आहे. येत्या तीन वर्षांत त्याचीही विक्री होणार आहे.