अहमदनगर : राहुरी तालुक्याची कामधेनू वाचविण्यासाठी तनपुरे साखर कारखाना बचाव कृती समितीने लढा हाती घेण्याचे ठरविले आहे. याविषयी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तथा औरंगाबाद उच्च न्यायालयाचे विधिज्ञ अॅड. अजित काळे यांच्या उपस्थितीत १० फेब्रुवारीला राहुरीत बैठक होणार आहे. कारखान्याचा जिल्हा बँकेने ताबा घेतला असून सर्वांच्या पाठबळाने कारखाना सुरू करण्यासाठी कारखाना बचाव कृती समितीने कारखाना सुरू करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.
बंद पडलेला तनपुरे कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडे असून अनेकदा आवाहन करूनही कारखाना चालविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. कारखान्याच्या हितासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर तसेच जिल्हा बँकेला विनवणी करूनही तनपुरे कारखाना बंद अवस्थेत आहे. तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ पवार, राजूभाऊ शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, संजय पोटे, दिलीपराव इंगळे, भरत पेरणे, सुखदेव मुसमाडे, नारायण टेकाळे यांनी कारखाना सुरू व्हावा म्हणून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.