कोल्हापूर : उसाची ३५ कांड्या असणारी वाण तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे ऊस क्षेत्रात क्रांती होईल. याशिवाय एआय तंत्रज्ञान वापरून कमी पाणी आणि खताचा वापर करून जास्त साखर मिळवण्याच्या दृष्टीने प्रजाती विकसित करण्याबाबतही संशोधन केले जात आहे. या सगळ्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली. पवार यांनी शुक्रवारी आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधकांशी चर्चा केली. ते या केंद्राचे प्रेसिडंट आहेत. येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे त्यांनी बैठक घेतली. यावेळी आजरा येथील साखर कारखान्यासंदर्भातही बैठक झाली.
ते म्हणाले, ऊस संशोधन करण्यासाठी विशिष्ट हवामान वातावरणाची स्थिती लागते. त्यात नवीन जात, बियाणे हे पोषक वातावरणात तयार होते. आंबोलीची जागा यासाठी योग्य आहे. या ठिकाणी २५० ते ३०० उसाच्या जाती आहेत. येथे काय नवीन करता येईल, यासाठी संशोधन सुरू असते. कमी पाणी, कमी खत वापरून उसाची नवीन जात तयार करण्यात येत आहे. २० कांड्यांचा ऊस ३५ कांड्यापर्यंत नेण्याच्या दृष्टीने काम केले जात आहे. त्यासाठी एआय तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यासाठी शास्त्रज्ञ आणि शासन यांच्याशी संवाद साधून केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. यासाठी ही आढावा बैठक होती. हा प्रयोग यशस्वी झाला तर कस क्षेत्रात क्रांती होणार आहे.
पवार म्हणाले, कोकणातील काजू आणि आंबा संशोधन केंद्राचे काम अतिशय उत्कृष्ट आहे. राज्य सरकारने प्रोत्साहन द्यावे. केंद्रानेदेखील प्रोत्साहन देण्यासाठी प्रस्ताव पाठवला पाहिजे. दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधन कामदेखील चांगले आहे. जिल्ह्यात फळ प्रक्रिया उद्योगांची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले, व्हिक्टर डान्टस, जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार श्रीधर पाटील, व्ही. बी. पाटील आदी उपस्थित होते.