अमिलो (आजमगढ) : सठियांव साखर कारखान्याच्या साखर उताऱ्यात सातत्याने घट येत असल्याची पाहणी जनपद कुशीनगर येथील सावेरी ऊस संशोधन केंद्राच्या संशोधकांनी केली. संशोधक डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी परिक्षणानंतर उसातील ओलावा आणि ऊस तोडणीच्या व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे उताऱ्यात तूट येत असल्याचे सांगितले.
उसाची रिकव्हरी कमी येत असल्याने काळजीत पडलेल्या मुख्य व्यवस्थापक डी. पी. सिंह यांच्या शिफारशीनंतर तपासणीसाठी आलेल्या डॉ. मिश्रा यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आणि देवारा सहादतगंज, देवारा जदीद, सहदेवगंज, परशुरामपूर आदी ठिकाणी सँम्पल घेऊन तीन दिवस ऊसाच्या रसाची तपासणी केली. यावेळी उतारा ९.२५ ऐवजी एक टक्क्याने कमी ८.२५ टक्के इतका दिसून आला. उसाचे वजन कमी असल्याचे कारण समोर आले.
दुसरीकडे कारखान्याचे संचालक सुरेश राम यांनी आरोप केला आहे की, ऊस वाळत असल्याने आणि खरेदी केंद्रे योग्य पद्धतीने कार्यान्वीत नसल्याने उतारा घटला आहे. सठियांव साखर कारखाना ७ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. दीड महिन्याच्या काळात रिकव्हरी ८.५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. उसाची रिकव्हरी ९.५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे टार्गेट कारखान्याचे होते. एकूण ३८ खरेदी केंद्रांवरून ऊस घेतला जातो. मात्र, यातील काही केंद्रे बंद करून तेथील ऊस दुसरीकडे वळवण्यात आला आहे. परिणामी ऊसाची तोड वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी आहेत. कारखान्याला मनमानी पद्धतीने ऊस पुरवठा होत असल्याचा आरोप आहे. ऊस पुरवठ्यासाठी नियमानुसार ठेके दिले जातात. मात्र, त्यानंतर केंद्र बंद करून तेथील ऊस दुसरीकडे वळवला जात असल्याने अडचणी येत असल्याचा आरोप केला जात आहे.