नवी दिल्ली : चीनी मंडी
अल्विएन या जगातील सर्वांत मोठ्या साखर व्यापार कंपनीचे सीओओ बाहेर पडल्यानंतर कंपनीतील इतर बड्या पदाधिकाऱ्यांची गळती लागली आहे. सीओओ सोरेन जेन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर पाच महत्त्वाच्या पदांवरील कर्मचाऱ्यांनी बाहेरचा रस्ता धरला आहे. या सगळ्याचा परिणाम कंपनीच्या व्यापारावर होताना दिसत आहे.
अमेरिकेतील कृषी व्यवसायातील अग्रणी कारगिल्ल आयएनसी आणि ब्राझीलच्या साखर आणि इथेनॉल निर्माते कॉपरसुकर एसए यांच्याशी अल्विएनची भागिदारी आहे. या कंपन्यांनी देखील सीओओ सोरेन जेन्सन कंपनीतून बाहेर पडल्याच्या वृत्तला दुजोरा दिला. सोरेन कंपनी स्थापन झाल्यापासून कॉपरसुकरसाठी काम करत होते. त्यांच्याजागी नोबेल ग्रुप लिमिटेडचे एनर्जी एक्झिक्युटिव्ह आणि सीईओ म्हणून काम पाहिलेल्या गॅरेथ ग्रिफथस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोरेन जेन्सन यांच्या पाठोपाठ सोफिए मेझ यांनीही कंपनीतून काढता पाय घेतला आहे. त्यांच्या बरोबर आणखी पाच कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर ही मंडळी काम करत होती. या संदभात अल्विएनने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमची धेय्य धोरणे आणि त्यांच्याशी असलेली आमची बांधिलकी कायम आहे. कर्मचाऱ्यांच्या बाहेर पडण्याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या कामांवर झाला असला तरी, त्यांच्या जागा भरणे हे अभिप्रेत आहे.