कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या दूरूस्तीसाठी ८० कोटी रुपयांची घोषणा केल्याबद्दल भोगावती सहकारी साखर कारखान्यातर्फे त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित भोगावती कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष, आमदार पी.एन. पाटील याच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर कार्यक्रमात आमदार पी. एन. पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मंजुरी दिली.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आ. पाटील यांनी काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळतीचा प्रश्न लावून धरला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाची माहिती घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. आ. पाटील म्हणाले, आता काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न निकालात निघणार आहे. गळती काढल्यानंतर लाखो लिटर वाया जाणारे पाणी वाचणार आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील- कौलवकर, कृष्णराव किरूळकर, हिंदुराव चौगले, संजय पाटील आदीसह संचालक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.