कोल्हापूर : राज्यातील सहकारी साखर कारखानदारी विविध कारणांनी प्रचंड अडचणीत आहे. अशावेळी ‘रिस्ट्रक्चर’ (कर्जाचे पुनर्रचना) करण्यासाठी त्यातील अटी शिथिल कराव्या लागतील. चालू गळीत हंगामात उसाची कमतरता झाल्याने पूर्वहंगामी घेतलेल्या कर्जाची साखर कारखाने परतफेड करू शकत नाहीत. थकीत कर्जामुळे पुढील वर्षाच्या हंगामासाठी कर्ज मिळणे अवघड असून, कर्ज पुनर्रचना करावी, या साखर कारखान्यांच्या मागणीवर सरकार दरबारी विचार करू, असे आश्वासन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.
बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी ‘बिद्री’च्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यांचा श्री महालक्ष्मीची मूर्ती देऊन अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंत्री पाटील म्हणाले, सातत्याने ऊस दरामध्ये अग्रेसर राहून बिद्री कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जोपासले. कारखान्याच्या संचालक मंडळासह प्रशासन आदर्शवत काम करत आहे. अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, सरकारने सर्वच साखर कारखान्यांना दिलासा द्यावा. सहकार चळवळ मोडीत निघणाऱ्या अटी घालू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखान्याच्या कोणत्याही अडचणीप्रसंगी मी तुमच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. यावेळी अधिकारी, किसनराव चौगले, विश्वनाथ पाटील, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. सेक्रेटरी एस. जी. किल्लेदार यांनी आभार मानले.