कोल्हापूर : गडहिंग्लज तालुका सहकारी साखर (गोडसाखर) कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर रोजी गडहिंग्लज शहरात अर्धनग्न मोर्चासह बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवृत्त कामगारांच्या थकीत देण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांसोबत १७ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांबाबत चर्चा झाली. मात्र, वर्ष उलटून गेले तरी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ३१ मार्च २०२३ अखेर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमेची माहिती देण्याचे ठरले होते. अकरा महिने झाले तरी ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव खोत, दिनकर खोराटे, पांडुरंग कदम, अशोक कांबळे, संभाजी बुगडे यांच्यासह अन्य कामगारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली तीन वर्षे आमरण उपोषण, रास्ता रोको, भीक मांगो, अर्धनग्न मोर्चा, प्रांताधिकाऱ्यांना घेराव या सर्व बाबी करून देखील कामगारांना न्याय मिळत नसल्याने तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या कारखाना प्रशासन, जिल्हाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची तातडीची बैठक बोलवावी. सेवानिवृत्त कामगारांच्या संपूर्ण देय रकमेबाबत योग्य आदेश कारखाना प्रशासनाला द्यावेत अन्यथा ४ डिसेंबरपासून तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.