कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या लेखापरीक्षणासाठी पोलीस कारवाई करत दप्तर ताब्यात घ्यावे आणि कारखान्याच्या कामगार सेवकांची पतसंस्था व सोसायटीची चौकशी करून कामगारांना मिळणाऱ्या सोयी सवलती देण्याची मागणी कारखान्याचे सभासद व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. याबाबत साखर आयुक्तांच्या नावे निवेदन देण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ दप्तर व कागदपत्रे उपलब्ध करून देत नसतील तर पोलीस कारवाईने दप्तर तातडीने उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी केली आहे.
याबाबत कामगारांच्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या तक्रारीनंतर गडहिंग्लज साखर कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण तृतीय विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील करीत आहेत. मात्र, मुदतीत लेखापरीक्षण अहवाल दिला गेला नाही. कारखाना कामगारांची पतसंस्था व सोसायटी या संस्थांचे कारखाना सुमारे दोन ते तीन कोटी रुपये देणे लागत आहे. त्याची चौकशी करून कारवाई करावी. निवेदनावर शिवाजी खोत, रणजीत देसाई, आप्पासाहेब लोंढे, महादेव मांगले, सुरेश पाटील, बबन पाटील, लक्ष्मण देवार्डे, दिनकर खोराटे, रामा पालकर, अशोक कांबळे, सदाशिव कांबळे, राजू कोकीतकर यांच्या सह्या आहेत.