कोल्हापूर : सेवानिवृत्त कामगार संघटनेने गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे लेखापरीक्षण तातडीने करण्याची मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. सरकारने बी. बी. पाटील यांची नेमणूक लेखापरीक्षणासाठी केली पण साखर प्रशासनाने दप्तर उपलब्ध करून दिले नसल्याचा अहवाल त्यांनी प्रादेशिक सहसंचालकांना दिला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने लेखापरीक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कारखाना अध्यक्षांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग बेकायदेशीररीत्या केल्याचे उघडकीस येणार या भीतीने दप्तर स्वतःच्या घरी नेऊन ठेवल्याचे समजते. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण करण्यापासून पळ काढला आहे. कारखाना चालवायला देण्याबद्दल नोटीस काढून ती रद्द का केली याचा खुलासा करावा. कामगारांचे पैसे थकीत आहेत. याबाबत चर्चेसाठी १३ जून रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठक निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर गोडसाखर कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, आप्पासाहेब लोंढे, महादेव मांगले, तुकाराम देसाई, लक्ष्मण देवार्डे यांच्यासह सेवानिवृत्त कामगारांच्या सह्या आहेत.