सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू. लाड सहकारी कारखान्याचा ऊस विकास व कृषी विभागाच्यावतीने सामूहिक गोगलगाय नियंत्रण अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत कुंडल येथील सिद्धेश्वरनगर, मोरू लाड मळा, डुबल मळा परिसरातील ऊस पिकामधील गोगलगाई गोळा करण्यात आल्या. परिसरामध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाची मोठी हानी होण्याचा धोका आहे. गोगलगाय प्रादुर्भाव हा भुईमूग, सोयाबीन, हळद, पपईसह सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांवर आढळून येत आहे. मात्र, द्राक्षबाग व ऊस पिकावर कमी अधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे.
आमदार अरुणअण्णा लाड, ‘क्रांती’चे अध्यक्ष शरद लाड यांनी पुढाकार घेऊन क्रांती कारखाना, ग्रामपंचायत कुंडल व कृषी विभागाला गोगलगाईंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर उपाययोजनेसाठी सूचना केल्या. त्याप्रमाणे हे अभियान राबविले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देशमुख, ‘क्रांती’चे शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, कृषी सहायक आकाश शेटे, गट प्रमुख हर्षल पाटील, अजय पवार, संदेश कुंभार, ओंकार जाधव, जयकर मुळीक, विजय लाड, दिनकर पाटील, प्रकाश देशमुख, किरण लाड,अरुण लाड, प्रकाश सोळवंडे, मानसिंग देशमुख, फैयाज मुलाणी, शंकर लाड, अर्जुन कुंभार आदी उपस्थित होते.