नवी दिल्ली : भारतासोबतच्या खराब संबंधांचा बांगलादेशवर परिणाम होऊ लागला आहे. बांगलादेशचे अंतरिम सरकार अन्न पुरवठा संकट आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असल्याचे दिसते. या शेजारील देशात गेल्या तीन आठवड्यांपासून जवळपास सर्व प्रकारच्या तांदळाच्या किमतीत वाढ झाली आहे. ढाक्यातील कारवान, मीरपूर आणि काझीपूरसह अन्य बाजारपेठांमध्ये उत्तम तांदळाच्या किमतीत ६ ते ८ रुपयांनी, सामान्य दर्जाच्या तांदळाच्या किमतीत ५ ते ६ रुपयांनी आणि भरड तांदळाच्या किमतीत ५ ते ६ रुपयांनी वाढ झाली असे डेली मेलने म्हटले आहे. तीन आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, भारताने डिसेंबर २०२४ मध्ये नेबरहुड फर्स्ट या धोरणांतर्गत बांगलादेशला मदत केली होती. बांगलादेशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी तेथील अंतरिम सरकारने भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बांगलादेशमध्ये १७ डिसेंबरपर्यंत अन्नसाठा ११.४८ लाख टन होता, ज्यापैकी सुमारे ७.४२ लाख टन तांदूळ होता. राजधानी ढाक्यातील कारवान बाजारातील एका व्यापाऱ्याने सांगितले की, करात सूट आणि भारतातून आयात असूनही, तांदळाच्या किमतीत अशा प्रकारची वाढ होणे ही सामान्य बाब नाही. यासाठी बड्या कंपन्या आणि कारखानदार जबाबदार आहेत, जे भात खरेदी आणि साठवणुकीत गुंतले आहेत. बांगलादेशच्या मझुमदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या एमडीनीं सांगितले की, तांदूळ आयात करण्याची परवानगी मिळाल्यानंतर, कंपनीने २०,००० टन भरड तांदूळ आयात केला. परंतु त्याची मागणी कमी राहिली. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये, बांगलादेशच्या नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने तांदळाच्या आयातीवरील आयात शुल्क आणि नियामक कर काढून टाकला आणि आगाऊ आयकर पाच टक्क्यांवरून दोन टक्क्यांवर आणला.