नवी दिल्ली : विविध वस्तूंच्या उच्च किमती, वाढलेले व्याजदर आणि रशिया-युक्रेन संघर्ष यामुळे अन्न उद्योगाला मोठा फटका बसला आहे, असे ब्रिटानिया इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीने आपल्या २०२२-२३ या वर्षीच्या अहवालात म्हटले आहे. या घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर दीर्घकालीन प्रभाव जाणवत आहे, असे ब्रिटानियाने स्पष्ट केले आहे.
अहवालात म्हटले आहे की, कमोडिटीजच्या अस्थिर किमती आणि महागाई अभूतपूर्व स्तरावर होती. मात्र, कोविडनंतर आर्थिक घडामोडी सामान्य झाल्याने २०२२-२३ मध्ये विकासाला पाठबळ मिळाले आहे. कंपनीने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात, अन्न उद्योगासमोर गहू, दूध, साखर, पाम तेल, कच्चे तेल अशा घटकांच्या खर्चातील महागाईचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान होते. ब्रिटानियाच्या बिस्किट, केक, रस्क, ब्रेड यांसारख्या पदार्थांचा खप अधिक असतो.
अन्न क्षेत्राच्या दृष्टिकोनाबाबत कंपनीने म्हटले आहे की, जागतिक मंदीची भीती असूनही, देशातील व्यवसाय अजूनही मागणीच्या स्थितीबद्दल आशावादी आहेत. आगामी वर्षातील महागाईचा वेग अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटकांवर अवलंबून असेल. अन्नाच्या किमती आणि ग्रामीण विकासाचा दृष्टीकोन मुख्यत्वे हवामान आणि मान्सूनच्या पावसाच्या पर्याप्ततेवर अवलंबून असेल असे अहवालात पुढे म्हटले आहे. ब्रिटानियाने म्हटले आहे की, कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाने कठीण महागाईच्या स्थितीचा सामना केला आहे आणि २०२२-२३ या काळात नव्या भौगोलिक क्षेत्रात विस्तार केला आहे.
आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात कंपनी ब्रँड इक्विटी मजबूत करण्याचे धोरण राबवत आहे. कंपनीचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय मध्य पू्र्व, अमेरिका, आफ्रिका, आशिया, सार्क देशांमध्ये आहे.