कोल्हापूर, दि. 5 : कोल्हापूर आणि सातारा घाट क्षेत्रात आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोयना धरणातून 70 हजार 404 क्युसेक पाण्याचा विसर्ग तर राधानगरी धरणाच्या स्वयंचलित 5 दरवाजामधून 8 हजार 540 क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर तुळशीमधून 1 हजार 11, वारणामधून 11 हजार 703, दुधगंगामधून 11 हजार 900, कासारीमधून 1 हजार 200,पाटगावमधून 1 हजार 874 आणि कुंभीमधून 1400 क्युसेक विसर्ग सुरू आहे. एकूण 42 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
आज दुपारी 4 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीची पातळी 28 फूट 11 इंच इतकी आहे. येथील इशारा पातळी 39 फूट तर धोक्याची पातळी 43 फूट आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन दक्ष असून या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नदीकाठच्या लोकांनी विशेषत: आपत्तीबाधित नागरिकांनी दक्ष रहावे,असे आवाहनही त्यांनी केले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.