नवी दिल्लीत केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राज्ये आणि राज्य विद्युत सुविधा विभागांसह नियोजन आणि देखरेख आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. 10 आणि 11 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित या बैठकीला आज ऊर्जा राज्यमंत्री कृष्ण पाल, सचिव (ऊर्जा) आलोक कुमार, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव बी एस भल्ला, राज्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव/सचिव/प्रधान सचिव/सचिव (वीज /ऊर्जा) आणि राज्य विद्युत सुविधा विभागांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.
देशाच्या एकूण आर्थिक वृद्धीमध्ये व्यवहार्य आणि आधुनिक ऊर्जा क्षेत्राच्या महत्वावर आर.के, सिंह यांनी भर दिला. भारताला विकसित राष्ट्र बनण्यासाठी 24X7 दर्जेदार, खात्रीशीर आणि किफायतशीर वीजपुरवठा आवश्यक आहे, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीदरम्यान, मंत्र्यांनी वीज वितरण क्षेत्रातील योजनांसाठी एकात्मिक वेब पोर्टलच्या आरडीएसएस मॉड्यूलचा देखील प्रारंभ केला. हे पोर्टल सर्व वितरण क्षेत्रातील योजनांच्या देखरेखीमध्ये क्रांती घडवून आणेल.
विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमतेच्या उपलब्धतेच्या दृष्टीने पुरेशी संसाधने सुनिश्चित करण्याच्या गरजेवर मंत्र्यांनी भर दिला.मागणी कमी असतानाच्या कालावधीत नियोजनबद्ध निगराणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.देशातील विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वीज निर्मितीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील व्यवहार्यतेच्या महत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
राज्य/केंद्र सरकार, सुविधा विभाग आणि उद्योग यासह सर्व संबंधितांचे एकत्रित प्रयत्न देशातील आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत ऊर्जा क्षेत्राकडे अखंड संक्रमण सुनिश्चित करतील.
(Source: PIB)