पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने २० मे रोजी सकाळी १० वाजता मुख्य कार्यालयासमोर ऊस लागवड हंगामाचे धोरण ठरवण्यासाठी एका विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रात ऊस लागवड हंगामाचा शुभारंभ १५ जूनच ठेवावा की १ जुलै करावा, आडसाली ऊस लागवडीवर नियंत्रण कसे आणावे आणि खोडवा उसात वाढ कशी करावी, यावर चर्चा केली जाणार आहे. संचालक मंडळाने धोरण ठरवताना शेतकऱ्यांची मते विश्वासात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ही अनोखी पद्धत अवलंबण्यात आली आहे.
सोमेश्वर कारखान्याचे चार तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. कारखान्याची गाळप क्षमता २००७ मध्ये ५,००० टन करण्यात आली. आता ती साडेसात हजार टन प्रतिदिन झाली आहे. तरीही गाळपासाठी पाच ते सहा महिने लागतात. शेतकरी आडसाली ऊस लागवडीवर भर देत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. आडसाली ऊस फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत तोडला जातो. त्यामुळे पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाची तोडणी वीस महिन्यापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहते. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. यंदाच्या हंगामात आडसाली उसाची लागवड १७ हजार एकरमध्ये होती. त्याआधीही १६ ते १८ हजार असेच प्रमाण राहिले. त्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणत्या वाणावर भर द्यावा याचे मार्गदर्शनही केले जाणार आहे.