अथर्व-दौलत कारखान्यामध्ये नव्या हंगामासाठी रोलर पूजन

कोल्हापूर : अथर्व संचलित दौलत साखर कारखान्यात सोमवारी २०२४-२५ गळीत हंगामाच्या मिल रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याचे संचालक विजय पाटील यांच्या हस्ते व टेक्निकल मॅनेजर एम. आर. पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अध्यक्ष मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने गेले पाच गळीत हंगाम यशस्विरीत्या पूर्ण केले आहेत. अथर्व-दौलतची वाटचाल गतीने सुरू आहे. कारखान्याने ऊस उत्पादकांची ऊस बिले वेळोवेळी अदा करण्याची परंपरा कायम जोपासली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

संचालक विजय पाटील यांनी सांगितले की, अथर्व दौलत कारखान्याकडे १६ हजार २५० हेक्टर इतकी उसाची नोंद झाली आहे. त्यानुसार कारखान्याने गळीत हंगामासाठी सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना व्यवस्थापन कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळपासाठी प्रयत्न करणार आहे. गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने केलेली सक्षम तोडणी वाहतूक यंत्रणा कराराचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कारखान्याचे अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी, शेतकरी व ऊस तोडणी-ओढणी कंत्राटदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here