लातूर : उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट – दोनमध्ये आगामी गाळप हंगामासाठी कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याच्या गाळप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आले आहे. ऊस शेतकऱ्यांच्या पाठबळावर साखर कारखाना दरवर्षी विक्रमी ऊस गाळप करण्यात यशस्वी झाल्याचे वैशाली देशमुख यांनी सांगितले. साखर कारखाना व्यवस्थापन शेतकरी हितासाठी यापुढेही कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यकारी संचालक ए.आर.पवार म्हणाले कि, कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे. आगामी गळीत हंगामासाठीची तांत्रिक कामेही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका लक्ष्मीबाई भोसले, विजय निटुरे, संचालक गोविंद बोराडे, नारायण पाटील, रणजीत पाटील, अमृत जाधव आदी उपस्थित होते.