कोल्हापूर : मागील गळीत हंगामातील थकीत १०० रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा कारखान्यांची साखर अडवण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील दत्त, गुरूदत्त, जवाहर, शरद व पंचगंगा या साखर कारखान्यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. जर हप्ता दिला नाही तर एकाही कारखानदाराला लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मागील हंगामातील थकीत बिलापोटी ४०० रुपये द्या, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे-बेंगलोर महामार्ग रोखला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मध्यस्थी करून १०० रुपये प्रती टन देण्याचे आपल्या साखर कारखान्याने जाहीर केले. ही रक्कम दोन महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी आश्वासन साखर कारखान्यांनी दिले. तरीही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले नाहीत. कारखान्याने तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले वर्ग करावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी अण्णासो चौगुले, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, राम शिंदे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, राजाराम देसाई, आप्पा ऐडके, शिवाजी आंबेकर, शिवाजी पाटील, संपत पोवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.