बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
नवी दिल्ली : चीनी मंडी
गेल्या हंगामाच्या तुलनेत २०१८-१९मध्ये साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना, हंगामाच्या पहिल्या चार महिन्यांत साखर उत्पादन ८ टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे. जानेवारी अखेर देशात १८५ लाख टन साखर उत्पादन होऊन तयार झाल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे. त्याचवेळी ऊस उत्पादकांच्या थकबाकीचा प्रश्न मात्र गंभीर होत चालला आहे.
असोसिएशनने ऑक्टोबर २०१८ मध्ये यंदाच्या हंगामाविषयी एक अंदाज व्यक्त केला होता. त्यात देशात ३२५ लाख टन साखर उत्पादन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर असोसिएशनने सुधारीत अंदाज व्यक्त केला. त्यात ३०७ लाख टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे. असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशातील एकूण ऊस बिल थकबाकी २० हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. जर, हंगामातील पुढच्या तीन महिन्यांत गाळपाचा वेग असाच राहिला आणि साखरेचा किमान विक्री दर २९ ते ३० रुपयांच्या आसपासच राहिला तर, साखर करखान्यांना उसाचे एफआरपीचे दैसे देणे शक्य होणार नाही, असे मत असोसिएशनने व्यक्त केले आहे. जर, उत्पादन आणखी वाढले तर, एप्रिल २०१९ मध्ये परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती असोसिएशनने व्यक्त केली आहे.
असोसिएशनने म्हटले आहे की, देशात किमान विक्री किंमत २९ ते ३० रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात ५ ते ६ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची देणी भागवण्यासाठी आणि साखरेचा उत्पादन खर्च काढण्यासाठी किमान विक्री किंमत ३५ ते ३६ रुपये करण्याची मागणी असोसिएशनने केंद्राकडे केली आहे.
असोएशनने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी हंगामाच्या पहिल्या चार महिन्यांत ५०४ साखर कारखान्यांमधून देशात १७१.२३ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तर, याच काळात यंदाच्या हंगामात ५१४ कारखान्यांतून १८५.१९ लाख टन उत्पादन झाले आहे. काही साखर कारखान्यांनी यंदा हंगाम सुरू होताच लवकर गाळप सुरू केल्याने पहिल्या टप्प्यात उत्पादन वाढल्याचे दिसत आहे. काही राज्यांमधील दुष्काळी स्थिती, उसावरील रोग, रिकव्हरी आणि बी ग्रेड मळीपासून इथेनॉल उत्पादन यांमुळए यंदा ३०७ लाख टन एकूण साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. असोसिएशनच्या पहिल्या अंदाजापेक्षा हे उत्पादन ५ ते ६ टक्क्यांनी कमी आहे.
महाराष्ट्राचा विचार केला तर, ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या काळात ७०.७० लाख टना साखर उत्पादन झाले. गेल्या हंगामात याच काळात ६३.०८ लाख टन उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशात उत्पादन गेल्या वर्षीच्या ५३.९८ लाखांच्या तुलनेत ५३.३६ लाख टन झाले आहे.
देशातून साखर निर्यात अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. अनेक कारखाने त्यांना देण्यात आलेला निर्यात कोटा पूर्ण करण्यास तयार नाही तर, काही कारखाने निर्यातीसाठी हवा तेवढा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे सरकारने कारखान्यांवर निर्यातीसाठी दबाव टाकावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp