नवी दिल्ली : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १५.४७ लाख करदात्यांना २६,२७६ कोटी रुपये रिफंड दिले आहेत. एकूण परत देण्यात आलेल्या पैशांमध्ये व्यक्तीगत आयकरापैकी १५.०२ लाखहून अधिक करदात्यांना ७,५३८ कोटी रुपये आणि कंपनी करदात्यांपैकी ४४,५३१ करदात्यांना १८,७३८ कोटी रुपये रिफंड देण्यात आले आहेत.
आयकर विभागाने ट्विट करून ही माहिती दिली. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) एक एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या कालावधीत १५.४७ लाख करदात्यांना २६,२७६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम परत केली आहे असे ट्विट करण्यात आले आहे. मात्र, हे पैसे कोणत्या आर्थिक वर्षातील आहेत, याची माहिती देण्यात आलेली नाही. हे रिफंड २०१९-२० या आर्थिक वर्षात भरलेल्या रिटर्नशी संबंधीत असल्याचे समजते.
गेल्या वर्षी विभागाने २.३८ कोटी करदात्यांना २.६२ लाख कोटी रुपये परत केले होते. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये करदात्यांना परत दिलेली रक्कम २०१९-२० मध्ये परत दिलेल्या १.८३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ४३.२ टक्के अधिक आहे.