शाहू कारखान्यातर्फे प्रती टन ३,२०० रुपये दर जाहीर : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात, २०२३ – २४ साठी उसाला प्रती टन एकरकमी ३१०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. आता त्यामधे प्रती टन १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कारखान्यातर्फे प्रती टन ३,२०० रुपये देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ‘शाहू ग्रुप’चे नेते समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य सरकारच्या परवानगीनंतर गेल्या वर्षीच्या उसाचे प्रती टन ५० रुपये दिले जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शाहू कारखान्याने मागील गळीत हंगामासाठी प्रती टन ३००० रुपये दिले आहेत. गुरुवारी शासन, शेतकरी संघटना व कारखानदार यांच्यामध्ये झालेल्या समन्वय तोडग्यानुसार गेल्या वर्षीच्या उसासाठी प्रोत्साहनात्मक ऊसदर प्रती टन ५० रुपये दिले जाणार आहेत. राज्य शासनाकडून रीतसर परवानगी मिळाल्यानंतर व कारखान्याच्या निधी उपलब्धतेनुसार ही रक्कम शेतकऱ्यांना देत आहोत. दरम्यान, कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांचे आशीर्वाद आणि कारखान्याच्या चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनानुसार ‘शाहू’ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत त्यांच्या हिताचे निर्णय घेणार, असे समरजितसिंह घाटगे म्हणाले. चालू गळीत हंगामाचा कालावधी फारच कमी आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उद्दिष्ट पूर्ततेसाठी सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here