कोल्हापूर : कारखानदारांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ४०० रुपये जमा करावेत. पैसे मिळाले तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल. अन्यथा कोणत्याही साखर कारखानदाराला दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कुंभोज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व कुंभोज ग्रामस्थांनी आक्रोश पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी ते बोलत होते.
हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमध्ये भव्य मिरवणुकीने माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा दसरा चौकमार्गे एसटी स्टँड परिसरात आली. बसस्थानकावर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला शेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर झालेल्या कोपरा सभेत सरपंच जयश्री जाधव, उपसरपंच अजित देवमोरे, सदस्या अरुणादेवी पाटील, निवास माने, श्रीकांत माळी, विनोद शिंगे आदींची भाषणे झाली.
यावेळी माजी खासदार शेट्टी यांचा सत्कार करून ऊस परिषदेसाठी जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. रावसाहेब हिंगलजे यांच्याकडून संघटनेला रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. शपथ घेऊन पदयात्रा नेज शिवपुरीकडे प्रस्थान झाली. सरपंच जयश्री जाधव, वारणा दूध संचालक अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, काँग्रेस महिला अध्यक्ष सविता पाटील, भरत भोकरे, माधवी माळी, श्रीकांत माळी, उपसरपंच अजित देवमोरे, महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील अनिल भोकरे, पंकज पाटील आदी उपस्थित होते.