नगर : सध्याचे साखर व इथेनॉलचे दर बघता उसाला प्रती टन पाच हजार रुपये दर देणे सहज शक्य आहे. दर का देता येत नाही हे कारखानदारांनी व राज्य सरकारने समोरासमोर बसून चर्चेत सांगावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली. नगर जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे नेवासे येथे आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते.
ऊस परिषदेला संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिसिंह नानासाहेब पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नांदखिले, त्रिंबक भदगले, नरेंद्र काळे, हरिभाऊ तुवर, डॉ. रोहित कुलकर्णी, अमृत शिंदे, शिवाजी लाडके, लक्ष्मण पाटील, बाबासाहेब नागोडे, किरण लंघे, अशोक नागोडे उपस्थित होते. कांद्यासारख्या पिकावर काँग्रेसने सातशे रुपये प्रती क्विंटल निर्यात मूल्य लावले. परंतु मोदी सरकारने त्यावर कळस करून आठशे रुपये क्विंटल निर्यात मूल्य लावून कांद्याचे भाव पाडण्याचे काम केले असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केला.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, एक टन उसापासून ९० लिटर इथेनॉल तयार होते. आजचे बाजार भाव ६७ रुपये, तरी इथेनॉलचेच फक्त सहा हजार रुपये होतात २००९-१० ला एफआरपी कायदा लागू झाला, त्या वेळी रिकव्हरी बेस साडेआठ टक्के होता तो आज सव्वा दहा टक्के आहे. सद्यस्थितीत उसाला दर देणे सहज शक्य आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सोयीसाठी केंद्र व राज्य अंतराची अट काढत नाहीत. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चालले आहे.