लातूर : औसा तालुक्यातील शेतक-यांना उसाचा दर मांजरा साखर कारखान्याप्रमाणे पाहिजे असेल तर उसाची देखभाल तशी झाली पाहिजे. कारखान्याचे आधुनिकीकरण झाले पाहिजे. मारुती महाराज साखर कारखाना मांजरा परिवारातील इतर कारखान्यांप्रमाणे पुढे गेला पाहिजे, असे आवाहन सहकारमहर्षि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
औसा तालुक्यातील मातोळी येथील सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन आमदार, लातूर जिल्हा बँकचे चेअरमन धीरज देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलते होते. यावेळी ह.भ.प. महेश महाराज, महत राजेद्रगिरी महाराज, प्रमोद जाधव, आबासाहेब पाटील, सरपंच आशा भोसले, राजेंद्र भोसले, अशोक कदम, सुभाष पवार, व्यंकटराव पाटील, धनंजय भोसले आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांनी मारुती महाराज साखर शेतकरी कारखान्याची उभारणी केल्याचे मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. आता साखर कारखाना व्यवस्थित चालविण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे ते म्हणाले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे मत आ. धीरज देशमुख यांनी व्यक्त केले, यावेळी माजी अध्यक्ष तथा संचालक ॲड. श्रीपतराव काकडे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक मातोळा संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भोसले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रताप भोसले यांनी केले.