नवी दिल्ली : देशातील आणखी एक को-ऑपरेटिव्ह बँक बंद होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने पुढील आठवड्यापासून पुण्यातील रुपी सहकारी बँकेला टाळे लागणार आहे. जर तुमचे अकाउंट या बँकेत असेल, तर लवकरात लवकर आपली ठेव येथून काढून घ्यावी. आरबीआयने ऑगस्ट महिन्यात रुपी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता २२ सप्टेंबर रोजी याच्या बँकिंग सेवाही बंद केल्या जाणार आहेत. या दिवशी बँकेचे कामकाज बंद होईल. त्यानंतर ग्राहकांना बँकेतून पैसे काढणे शक्य होणार नाही.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, रुपी सहकारी बँकेमध्ये पुरेशा ठेवी आणि व्यवहारांची शक्यता नसल्याने आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेची आर्थिक स्थिती खूप खराब होती. बँकेकडे भांडवलाची कमतरता होती. त्यामुळे ही कारवाई झाली आहे. बँकेकडे ज्या ग्राहकांच्या ठेवी आहेत, त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेवर विमा लाभ मिळेल. इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून ही विमा सुविधा मिळत आहे. आरबीआयने रुपी बँकेवरील कारवाईबाबत १० ऑगस्ट रोजीच माहिती जारी केली होती.