राज्याच्या साखर पट्ट्यात ऊसाला पाणी मिळवण्यासाठी धावाधाव

कोल्हापूर : राज्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. जर येत्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही तर ऊस पिकाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या भरवशावर ऊस लागवडी केल्या. मात्र, या उसाला पाणी देताना दमछाक होत असल्यातचे चित्र सध्या पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात आहे. दुष्काळी स्थितीचा मोठा फटका ऊस पट्ट्यालाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याची स्थिती चांगली असली तरी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पाण्याअभावी ऊस पीक वाळू लागले आहे. त्याचा फटका आगामी हंगामात ऊस उत्पादनाला बसू शकतो.

अनेक शेतकरी योजनेचे पाणी आणि स्वतःजवळील विहीर, बोअरचे पाणी याचा समन्वय साधून ऊस लागवड करतात. पण विहिरी व कूपनलिकांमधील पाणीच कमी झाल्याने सगळा भार नद्यांतील पाण्यावर येत आहे. नदीच्या पाण्याची क्रमपाळी दहा ते पंधरा दिवसांनी येत असल्याने पुरेसे पाणी मिळवणे हे दिव्य ठरत आहे. ज्यांच्याकडे ठिबकची यंत्रणा आहे, अशा शेतकऱ्यांना ठिबकचे पाणीही कमी पडत असल्याचे चित्र यंदा पहिल्यांदाच दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत पाणी देणे गरजेचे असल्याने दुसरीकडून विनवण्या करून विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी पाणी टंचाईमुळे ऊस लागवड करणे टाळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here