रशियाने २०२२ च्या अखेरीपर्यंत उत्पादनांच्या एका साखळीवर निर्यात निर्बंध लागू करून युक्रेनवर हल्ला केल्याबाबत पाश्चिमात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर दिले आहे. बीबीसीने याबाबतचे वृत्त दिल्याचे हिंदी siasat डॉट कॉम वेबसाइटवरील प्रकाशित वृत्तामध्ये म्हटले आहे. या निर्बंधामध्ये दूरसंचार, आरोग्य, वाहन, कृषी, विज उपकरणांसह लाकूड अशा कुटिरोद्योगांच्या उत्पादनांच्या निर्यातीचा समावेश आहे. अर्थव्यवस्था मंत्रालयाने म्हटले आहे की, यापुढील उपाय योजनेत रशियाच्या बंदरांवर परदेशी जहाजांना निर्बंध घालण्याच्या उपायांचा समावेश असेल. रशियावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना ही तर्कशुद्ध प्रतिक्रीया आहे असे त्यांनी म्हटले आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, मंत्रालयाने सांगितले की, ज्या देशांनी अमित्र कार्य करणाऱ्या देशांवर निर्बंध लागू केले आहेत, त्याचा उद्देश अर्थव्यवस्थेच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये कामकाजाची आखणी करणे हा आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर खास करुन तेल खरेदी करण्यावर तसेच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या निकटवर्तीय अब्जाधिश घराण्यांवर अनेक निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयामुळे युरोपियन संघ आणि अमेरिकेसह ४८ देशांना फटका बसू शकतो. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांनी सांगितले की, निर्बंधांमध्ये रशियात काम करत असलेल्या परकीय कंपन्यांकडून केलेल्या सामानांच्या निर्यातीचा समावेश असेल. या वस्तूंमध्ये कार, रेल्वे कॅरेज, कंटेनर आदींचा समावेश आहे. रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी पाश्चिमात्य कंपन्यांच्या मालकीतून जी संपत्ती रशियातून बाहेर जाते, त्याचे राष्ट्रीयिकरण केले जाऊ शकते असा इशारा दिला होता. त्यामुळे कॅटरपिलर, रिया टिंटो, स्टारबक्स, सोनी, युनिलिव्हर आणि गोल्डमॅन सॅक्ससारख्या औद्योगिक आणि खाण दिग्गजांह फर्म सामूहिकरुपात गुंतवणूक सोडत आहेत, अथवा थांबवत आहेत.