रूस-यूक्रेन युद्धाची चिंता : अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम शक्य

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तीव्र झाले आहे. भारतासह जगभरातील घटकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. सर्व देशांच्या नजरा युक्रेनच्या स्थितीवर आहेत. युद्धाच्या पाचव्या दिवशी, सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत युक्रेनसोबतच्या व्यापार संबंधावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. सरकार भारताच्या परकीय व्यापार, खास करुन कृषी क्षेत्राच्या निर्यातीवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंतेत आहे असे सीतारमण यांनी स्पष्ट केले.

याबाबत अमर उजाला डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, तामीळनाडूतील व्यापार आणि उद्योग जगतातील नेत्यांसोबत अर्थसंकल्पानंतर चर्चा करताना सीतारमण म्हणाल्या, सराकरने रशिया-युक्रेनच्या स्थितीवर बारिक नजर ठेवली आहे. व्यापारावर होणाऱ्या परिणामांचा वेध घेतला जात आहे. आयात-निर्यातीवर खूप परिणाम जाणवेल. भारताला खाद्य तेलासह इतर अनेक बाबतीत फटका बसू शकतो. जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम होईल. विविध मंत्रालयांच्या माध्यमातून याचा आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी गेल्या गुरुवारी युक्रेनवर सैन्य कारवाईची घोषणा केली होती. त्यानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी पुतीन यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर आठ वर्षांच्या सर्वोच्च स्तरावर आहेत. शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती गुरुवारी १०५ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here