सांगली : मागीलवर्षी २०२३- २४ मध्ये झालेल्या उसाला दोनशे रुपये अंतिम बिल व यावर्षी २४-२५ मध्ये गळीत होणाऱ्या उसाला पहिला हप्ता ३७०० रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. पंधरा दिवसांत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक घेऊन मार्ग काढावा; अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी निवेदनाद्वारे क्रांती – साखर कारखाना व सोनहिरा साखर कारखाना व्यवस्थापनाला दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २४ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन २०२३-२४ साठी दोनशे रुपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या गळीत झालेल्या उसाला प्रति टन ३७०० रुपये पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस परिषदेत मंजूर झालेल्या मागणीनुसार कारखान्यांनी कोणतीही हालचाल केली नाही.
हंगाम चालू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी पहिला हप्ता किती देणार, मागील वर्षाच्या गळीत झालेल्या उसाच्या अंतिम बिलाचे काय करणार, याबाबत कोणतेही धोरण जाहीर केले नाही. साखर कारखाना व्यवस्थापनाने येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक घेऊन काय तो मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, कडेगाव तालुका अध्यक्ष बाळासाो जाधव, पलूस तालुका अध्यक्ष बाळासाो शिंदे, अशोक पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.