अहिल्यानगर : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या ६१ व्या गळीत हंगामाची सांगता अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत संचालक राजेंद्र कोळपे व पत्नी स्वाती कोळपे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. इथेनॉलबाबत धोरणावर न्यायालयात कोल्हे कारखान्याने दाद मागितली आहे. तो निकाल लवकरच अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी गळीत हंगामाचा आढावा घेतला. कोल्हे साखर कारखान्याने मुक्त अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अभ्यासू नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या साथीने अनेक नवे प्रकल्प हाती घेतले आहेत. येत्या सहा महिन्यांत ते पूर्ण होतील, अशी अपेक्षा बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केली. उपाध्यक्ष मनेष गाडे, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी स्वागत केले. प्रगतशिल शेतकरी दत्तात्रय कोल्हे, कोल्हे कारखान्याचे संचालक विश्वास महाले, शरद थोरात, अरूण येवले, शिवाजी वक्ते, आप्पासाहेब दवंगे, संजय होन, रमेश घोडेराव, त्र्यंबक सरोदे, निवृत्ती बनकर, केशव भवर, साहेबराव रोहोम, रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.