अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने २०२३-२४ या गळीत हंगामात ५ लाख ८५ हजार टन उसाचे गाळप केले. उसाच्या संपूर्ण एफआरपीसह प्रतीटन २,७०० रुपयांप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा केला आहे. आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी गळितास आलेल्या उसाचा दोनशे रुपये प्रती टनाप्रमाणे दुसऱ्या हप्त्यापोटी ११ कोटी ७२ लाख रुपये २० ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. मागील गळीत हंगामात कारखान्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तोडणी मजूर कमी आल्यामुळे मोठी अडचण झाली. परंतु यावर्षी अशी अडचण येणार नाही, याची दक्षता घेत आहोत असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की, कारखाना २०२३-२४ या गळीत हंगामात गाळप केलेल्या ५ लाख ८५ हजार ४७० मेट्रिक टनाकरिता २०० रुपयांचा प्रोत्साहन अनुदान म्हणून हप्ता देत आहे. कारखान्यामार्फत सभासदांना दिवाळीसाठी १० किलो साखर प्रती किलो २० रुपयांप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. कारखाना साईट श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी व घारगाव या ठिकाणी दि. १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत साखर वाटप चालू राहणार आहे. सभासदांनी आधार कार्ड घेऊन संबंधित साखर वाटप केंद्रातून साखर घेऊन जावी. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे उपस्थित होते.