अहिल्यानगर : यंदाचे वर्ष दुष्काळाचे आहे. या बिकट परिस्थितीतही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने १०. ८५ लाख मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले. पुढील काळात कार्यक्षेत्रात १० लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. खर्च कमी करून जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यामुळे कारखान्याची अधिक आर्थिक प्रगती होवून, शेतकऱ्यांच्या ऊसाला आणखी चांगला भाव देता येईल, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. कारखान्याचा गळीत हंगाम सांगता समारंभ नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते.
कारखान्याचे अध्यक्ष ओहोळ म्हणाले, साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये १० लाख मेट्रिक टनाच्यापुढे गाळप केले, हे सांघिक कामाचे यश आहे. कारखान्याने ११.५० टक्के रिकव्हरी मिळवली. १०.५१ कोटी युनिट वीज निर्मिती केली. संकटावर मात करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, व्हा. चेअरमन संतोष हासे, गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते, विक्रांत दंडवते, अविनाश सोनवणे, गणपत सांगळे, जयश्री थोरात आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, सुभाष सांगळे, विक्रांत दंडवते आदी उपस्थित होते. व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.