सोलापूर : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात नऊ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी प्रती दिन ८,५०० मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा सज्ज असून कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासदांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले. कारखान्याचा ६३ वा बॉयलर प्रदीपन समारंभ अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभानिमित्त संचालक रामचंद्र ठवरे व कुसुम ठवरे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले म्हणाले की, कारखान्याने गत हंगामातील उसाकरिता ठरलेल्या धोरणाप्रमाणे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव माने- देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, भीमराव काळे, गोविंद पवार, तज्ज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत- पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.