सहारनपूर : साखर कारखान्यांनी यंदा उच्चांकी ऊस बिले अदा केली आहेत. गांगनौली आणि गागलहेडी वगळता उर्वरीत कारखान्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहेत. ऊस बिले देण्यात देवबंद साखर कारखाना सर्वात आघाडीवर असून गेल्यावर्षी प्रमाणे गांगनौली कारखाना पिछाडीवर आहे. याशिवाय ऊस बिलांची सरासरी पाहिली तर आतापर्यंत ७४.५० टक्के बिले दिली गेली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात गळीत हंगाम संपुष्टात आल्याची माहिती ऊस विभागाने दिली आहे. जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी हंगामात १८६२ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांचा ऊस खरेदी केला. तर कारखान्यांनी आतापर्यंत १३७९ कोटी ८६ लाख नऊ हजार रुपयांची बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. देवबंद कारखाना ६२५ कोटी रुपयांची बिले देवून आघाडीवर आहे. तर गांगनौली कारखान्याने ८२.६५ कोटी रुपये दिले आहेत. ही सर्वात कमी रक्कम आहे. शेरमऊ कारखान्याने २९१.२० कोटी सरसावा कारखान्याने ११९.८८ कोटी आणि ननौता कारखान्याने १८२.३३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले. अद्याप कारखान्यांकडे ४७२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. साखर कारखाने अपेक्षेप्रमाणे गतीने ऊस बिले देत आहेत, असे जिल्हा ऊस अधिकारी सुशील कुमार यांनी सांगितले.