सहारनपूर : जिल्ह्यात पिकांचे अवशेष, शेण, साखर कारखान्याच्या मळीपासून बायो सीएनजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) आणि जैविक खाद्य तयार केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात तीन युनिट्स स्थापन केली जात आहेत. यापैकी गंगोह विकास विभागातील इस्सेपूर गावात सेवोझोन एनर्जी अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्थापन करण्यात येणाऱ्या युनिटचे १५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२४ पर्यंत हे युनिट सुरू होईल अशी शक्यता आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिकांच्या अवशेषांची विल्हेवाट लावताना त्रास सहन करावा लागणार नाही. पिकांचे अवशेष, शेण, साखर कारखान्याच्या मळीपासून सीएनजी, जैविक खाद्य तयार केले जाईल. त्यातून प्रदूषणाला लगाम बसेल. शेतकरी पिकांचे अवशेष या युनिट्सना विकून उत्पन्न मिळवू शकतील. या युनिटमध्ये उत्पादीत बायो सीएनजी एका सरकारी तेल कंपनीला सहारनपूर, शामली आणि कर्नालमध्ये विक्री केली जाईल. तर जैविक खाद्य शेतकऱ्यांना विक्री केले जाईल.
या युनिट्समध्ये पोटॅश, एनपीके, डीएपी आदी जैविक खाद्य तयार होईल. ते स्वस्त असेल आणि मातीचे आरोग्यही चांगले टिकवून ठेवेल, अशी माहिती सेवोझोन एनर्जी अँड फर्टिलायझर कंपनीचे संचालक अमित राणा यांनी सांगितले. बायो सीएनजीच्या एका युनिटसाठी जागेचा शोध सुरू आहे, असे ते म्हणाले. शामलीतील बुटराडा आणि ऊन येथे युनिटसाठी जागा खरेदी करण्यात आली असून सढोली हरियामध्ये आणखी एक कंपनी निर्माणाधीन आहे, असे राणा म्हणाले.