सातारा : सह्याद्री सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांच्या पाच झोपड्यांसह संसारोपयोगी व इतर सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आगीत झोपड्या जळाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर पडले. या मजुरांचे संसार पुन्हा थाटण्यासाठी ‘सह्याद्री’चे चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील व माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी पुढाकार घेतला. नुकसानग्रस्तांना संसारोपयोगी साहित्यासह इतर साहित्य देण्यात आले.
यशवंतनगर येथे अचानकपणे आग लागून ऊस तोडणी कामगारांच्या पाच झोपड्या जळाल्या. याची माहिती मिळाल्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांनी तातडीने सर्व मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सरचिटणीस, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांना कारखान्याचे उपशेती अधिकारी नितीन साळुंखे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर मजुरांना संसारोपयोगी साहित्य आणि गॅस शेगडीचे वाटप केले. मुख्य शेती अधिकारी वसंतराव चव्हाण, उपशेती अधिकारी नितीन साळुंखे, इरिगेशन संपर्कप्रमुख आर. जी. तांबे, युवराज साबळे व मनीषा साळुंखे, मीनाताई साळुंखे, कैलास साळुंखे आदी उपस्थित होते.