सातारा:राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सलग चौथ्यांदा साखर निर्यातीबद्दलचा पुरस्कार पटकावला आहे. कारखान्याने नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) चा २०२२-२३ वर्षात देशामध्ये जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा द्वितीय क्रमांकांचा पुरस्कार मिळवला.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज या सहकारी साखर कारखान्याच्या शिखर संस्थेच्यावतीने देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करून पुरस्कार देण्यात येतात.नवी दिल्लीत झालेल्या समारंभात उत्तर प्रदेशचे ऊस विकास आणि साखर कारखानदार मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत केंद्रीय ऊर्जा आणि अवजड उद्योग राज्यमंत्री श्रीकृष्णपाल गुर्जर यांच्या हस्ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद, संचालक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांनी स्वीकारला.
नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑप. शुगर फॅक्टरीज (NFCSF) तर्फे गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम १० ऑगस्टला नवी दिल्ली येथे पार पडला. यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यामध्ये सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मिळाले.देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे.पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीतील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झाला.