सातारा : अत्यंत चुरशीने झालेल्या लढतीत विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता आपल्याकडे राखत कारखान्यावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना पराभूत करत भाजपने मोठा धक्का दिला होता. भाजपचे मनोज घोरपडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. या विधानसभा मतदारसंघाच्या बहुतेक भागातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर आता कारखान्यातही सत्तांतर घडवू, असा विश्वास विरोधकांना वाटत होता. पण निवडणूक एकतर्फी जिंकत बाळासाहेब पाटील यांनी विधानसभा पराभवाचे उट्टे काढले.
कारखान्याची सर्व सुत्रे दीर्घकाळ ताब्यात असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपांना आवश्यक तेवढी उतरे देत्त सभासदांना विश्वास देण्याचा प्रयत्न सातत्याने केला. प्रामुख्याने कारखान्याच्या विस्तारीकरणाचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. पण सभासदांनी पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांच्यावर विश्वास दाखविला. विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने सर्व आठ जागा जिंकल्यावर सहकार क्षेत्रात दमदार शिरकाव करण्याची संधी भाजपला या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चित होती. पण त्याचा फायदा पक्षाला घेता आला नाही.
विधानसभेवेळी पाटील यांचा झालेल्या पराभवाचा फायदा घेत विरोधकांनी त्यांना ‘सह्याद्री’च्या निवडणुकीत घेरण्याचा प्रयत्न केला; परंतु कारखान्याच्या कारभार बाळासाहेबच चांगला सांभाळू शकतात, या विश्वासावर सभासद मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याने त्यांनी विरोधकांचे चक्रव्यूह भेदले. त्यांचा मतदारसंघातील जनसंपर्क, कारखान्यातील कारभार, सर्वाधिक ऊसदर देण्याची परंपरा या साऱ्या जमेच्या बाजू बाळासाहेबांना विजयापर्यंत घेऊन गेल्या. त्यामुळे विरोधकांचे दोन्ही पॅनेल एकत्रित लढले असते, तरीही सह्याद्री बाळासाहेबांचाच राहिला असता, हेही या निकालातून स्पष्ट होते.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ, कॉंग्रेसचे निवास थोरात यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर करायचा बंग बांधून कारखाना कार्यक्षेत्रात फिल्डिंग लावली. मात्र, विधानसभेच्या निकालानंतरच सावध होऊन कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी पायाय भिंगरी बांधून लोकांशी संपर्क ठेवला, मोर्चेबांधणी केली आणि विजय खेचून आणला.