सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप करणार : चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील

सातारा : सह्याद्री साखर कारखान्याकडे सहकाराचा मानदंड म्हणून पाहिले जाते. सभासदांना योग्य न्याय देऊन कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाची सह्याद्रीची नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही माजी मंत्री तथा ‘सह्याद्री’चे चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ५० व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यंदा उसाचे प्रमाण कमी असून साखरेला चांगला दर मिळेल त्याचा जास्त फायदा सभासदांना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या वर्षात यशस्वी वाटचाल करताना ‘सह्याद्री’ने अनेक चढ-उतार पाहिले. कारखान्याच्या प्रगतीत अनेक दिग्गजांनी योगदान दिले आहे. गेल्या ५० वर्षात ‘सह्याद्री’ने सहकारात महत्वाची भूमिका बजावली आहे. कार्यक्षेत्र पाणी योजनांनी समृद्ध केले. रोजगाराच्या संधी दिल्या. अर्थकारणात परिवर्तन झाले. ऊस वाहतूक सुलभता व्हावी, यासाठी पाणंद रस्ते, छोटे पुल उभारले. ज्यांनी सुविधा दिल्या, त्यांनाच ऊस घालणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी माजी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, संगीता साळुंखे, कारखान्याच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई गायकवाड़, जितेंद्र पवार, आनंदराव कोरे, प्रणव ताटे, तानाजी साळुंखे, जशराज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. कार्यकारी संचालक दादासो पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here