Image Credits: Maharashtra Today
मुंबई – राज्यातील साखर उद्योगाच्या समस्यांसंदर्भात उपाय योजण्यासाठी सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शक्तिप्रदत्त समितीची स्थापना करण्याचे तसेच केंद्राकडे असलेल्या विविध विषयांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले.
साखर कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात तसेच बंद पडलेल्या साखर कारखान्यांसंदर्भात आज विधिमंडळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. साखरेचे दर, अतिरिक्त उत्पादनामुळे होणारी अडचण, एफआरपीचा दर, ऊस क्षेत्रात झालेली वाढ आदी विविध विषयांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘साखर कारखानदारांच्या व उद्योगांच्या समस्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून, या संदर्भात उपाय सुचविण्यासाठी सहकारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी साखर संघ, खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसह विविध विभागांचे सचिव यांचा समावेश आहे. ही समिती तातडीने कारखानदारांच्या समस्यांसंदर्भात उपाय सुचविणार आहे.