पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावच्या मुलभूत ऊस बियाणे विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख, ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांचे हस्ते सतीश काकडे, धोंडीबा दाईगुंडे, अनिल जमदाडे, नामदेव सकुंडे या प्रगतशील शेतकऱ्यांना फुले ऊस १५०१२ या वाणाच्या बेणेमळ्यातील पहिली मोळी देऊन बियाणे विक्री प्रारंभ करण्यात आला.
पाडेगाव संशोधन केंद्राने ६६ एकर क्षेत्रावर विविध ऊस वाणांचे मुलभूत बियाणे मळे तयार केले आहेत. उसाच्या मुलभूत बियाण्यांपासून कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत बेणे मळे तयार करून शेतकऱ्यांना बेणेपुरवठा करण्यात येतो.सध्या प्रामुख्याने २०२२ मध्ये या संशोधन केंद्राने महाराष्ट्रासाठी शिफारशीत केलेली फुले ऊस १५०१२ आणि राष्ट्रीय स्तरावर द्विकल्पीय उष्णकटिबंधीय प्रदेशामधील सात राज्यांसाठी प्रसारित झालेली फुले ऊस १३००७ या वाणाचे मोठ्या प्रमाणावर मुलभूत बियाणे मळे केंद्रामार्फत तयार केले आहेत. पाणी टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारित केलेली फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ ही वाण पाण्याचा ताण सहन करणारी आहेत.