सांगली : जिल्ह्यात काही अपवाद वगळता अनेक सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत. गेल्या काही वर्षात बंद पडल्याने पाच कारखान्यांची विक्री झाली. तर दोन कारखाने बंद आहेत. दुसऱ्या बाजूला खासगी साखर कारखाने जोमात सुरू आहेत. ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी सहकार चळवळीचा पाया घातला. कारखाने उभारले. मात्र, काळाच्या ओघात कारखान्यांची संख्या वाढली. त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली. आधुनिकीकरण येऊ लागले. मात्र, काही कारखान्यांनी काळानुरूप बदल केले नाहीत. त्यामुळे हे कारखाने अडचणीत आले आहेत.
आशिया खंडातील सर्वात मोठा अशी ओळख असलेला वसंतदादा कारखाना बंद पडला होता. नंतर तो कारखाना दत्त इंडिया कंपनीला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्यात आला आहे. नागेवाडी येथील यशवंत कारखाना, तासगाव, निनाईदेवी, डोंगराई, जत येथील विजयसिंहराजे डफळे हे कारखाने बंद पडले. नंतर त्यांची विक्री होऊन ते आता खासगी झाले आहेत. दुसऱ्या बाजूला कवठेमहांकाळ येथील महांकाली आणि आटपाडी येथील माणगंगा हे दोन साखर कारखाने बंद आहेत. जिल्हा बँकेचे कर्ज थकीत गेल्याने हे कारखाने जिल्हा बँकेच्या ताब्यात आहेत. इतरही संस्थांची देणी कारखान्यांवर आहेत. हे कारखाने चालविण्यास देण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते सुरू होऊ शकलेले नाहीत.