सोलापूर : यंदा पावसाने दडी मारल्याने विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी खालावली आहे. पाण्याचा फेर फिरणे अवघ़ड बनले आहे. शेतात ऊस वाळू लागला आहे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस चाऱ्यासाठी विक्रीस काढला आहे. चाऱ्यासाठी उसाला प्रती टन १८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. पाण्याअभावी पूर्ण नुकसान सोसण्याऐवजी शक्य असतील ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा जिल्ह्यात सरासरी ५४५ मिलिमीटर पाऊस झाला. सप्टेंबरअखेर ४३८ मिलिमीटर पाऊस झाला असून तो सर्वच तालुक्यात पुरेसा झालेला नाही. सर्वच तालुक्यांतील पाणीपातळी सरासरी ०.९७ मीटरने खालावल्याचे भूजल सर्वेक्षणात समोर आले आहे. सद्यस्थितीत पाणी पातळी घटत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे किमान काही खर्च मिळूदे यासाठी शेतकऱ्यांनी ऊसाची चाऱ्यासाठी विक्री सुरू केली आहे. सद्यस्थितीत उसाची १००० ते १८०० रुपयांपर्यंत विक्री सुरू केली आहे. कारखान्यांना ऊस पाठवून नंतर पैसे हातात पडण्यापेक्षा चाऱ्यासाठी त्याची विक्री करून जाग्यावर पैसे मिळविण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.