जालना : घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याचा गाळप समारंभ कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. याच कार्यक्रमात चेअरमन सतीश घाटगे-पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी शेतकऱ्यांसाठी समृद्धी कारखान्याचा विस्तारीकरणाचाही प्रारंभ केला. समृद्धीच्या १० हजार मे. टन गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी (दि. २२) हजारो ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या उपस्थितीत उत्साहात झाला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्यास तो सुटावा यासाठी प्रकल्प हाती घेतल्याचे चेअरमन घाटगे-पाटील यांनी सांगितले.
घनसावंगी येथील प्रत्येक घटकातील जनतेच्या विकासासाठी जे २५ वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांमध्ये करून दाखवीन असे प्रतिपादन सतीश घाडगे यावेळी केले. विस्तारीकरणानंतर समृद्धीची प्रतिदिन गाळप क्षमता १० हजार मे. टन होणार आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२५ पर्यंत उभा करण्याचा प्रयत्न समृद्धी कारखाना करणार आहे असे ते म्हणाले. भूमिपूजन सोहळ्यास विजय कामड, गौतम गोलेच्छा, शिवाजीराव बोबडे, बालाजी खोजे, भगवान बर्वे, बाळासाहेब बोरकर, पांडुरंग भांगे, अरुण घुगे, शिवाजीराव कटारे, शिवाजीराव कंटूले, शिवाजी नाना मोरे, राहुल कणके, नामदेव ढाकणे, पांडुरंग खटके, रामेश्वर माने आदी उपस्थित होते.