सोलापूर : ‘मकाई साखर कारखान्याच्या थकीत बिलासाठी तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांच्या घरावर संघर्ष समितीने गुरुवारी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू असून बागल यांचे निवासस्थान महाविद्यालय शेजारी आहे. या परिसरात कलम १४४ लागू असल्याचे कारण देत पोलिसांनी मोर्चा हनुमान मंदिरासमोरच अडवला. पोलिस उपनिरीक्षक विनायक माहुरकर यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांना परिस्थिती सांगितली. त्यानंतर झालेल्या सभेत जोपर्यंत बिले मिळाल्याचा एसएमएस येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा देण्यात आला.
बुधवारी थकीत ऊस बिलप्रश्नी करमाळा तहसील कार्यालयात मकाई संघर्ष समिती आणि प्रशासनाची बैठक झाली. यावेळी अद्याप ऊस बिले मिळालेली नसल्याने खात्यावर पैसे जमा झाल्याचा एसएमएस आल्यानंतरच आंदोलने बंद होणार असल्याचे समितीने जाहीर केले. अद्याप शेतकऱ्यांची ऊस बिले न मिळाल्याने शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, ॲड. राहुल सावंत, प्रा. रामदास झोळ, स्वाभिमानीचे रवींद्र गोडगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. बागल यांच्या घरावर निघालेला शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा सावंत गल्ली येथील हनुमान मंदिरासमोरच बॅरिगेट्स लावून पोलिसांनी अडविला.