सांगली : वारणा – कृष्णा नदीकाठावर ऊस शेती केली जाते. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने धुमाकूळ घातला. पुराचे पाणी शेतात जास्त दिवस राहिलेल्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नदी काठावरील तब्बल ४ हजार हेक्टरवरील ऊस शेती उद्ध्वस्त झाली आहे. जून महिन्यात पावसाच्या हाहाकारमुळे कृ्ष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांना महापूर आला. पाणी तब्बल दोन आठवडे शेतात असल्याने आणि पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ शेतात रुतून बसल्याने अपवाद वगळता आख्खे ऊस पीक कुजून गेले आहे.
वारणा नदीकाठावरील वाळवा, शिराळा तर कृष्णा काठावरील मिरज, पलूस या तालुक्यातील तब्बल ४ हजार हेक्टर वरील ऊस शेती महापुरात वाहून गेली. ऊस शेतीच्या या अवस्थेमुळे येथील कारखानदारांपुढे मोठे संकट ओढावले आहे. यंदा कारखान्याला ऊस कमी पडणार असल्याने गाळपावर याचा परिणाम होणार हे निश्चित आहे. संततधार पाऊस, महापुराच्या पाण्याने शेतीतील पीक वाहून गेले आणि शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार रुपये मदत मिळावी, यासाठी कृषी विभागाने प्रस्ताव पाठवले आहेत.