सांगली: जिल्ह्यात पुराने सुमारे 4500 हेक्टर क्षेत्र बाधित, उसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान

सांगली:गेल्या पंधरवड्यातील मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील सुमारे 9000 शेतकऱ्यांचे सुमारे 4500 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.यामध्ये ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.सध्या कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरूच राहिल्याने धरणातून पाणी सोडले आहे.शेतांतील ऊस, केळी, हळद, सोयाबीन आदी पिकांत पावसाचे पाणी साचून राहिले आहे.याचा शेतकरी वर्गाला फार मोठा फटका बसला.

वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेली आहेत.भाजीपाला, टोमॅटो, काढता येत नसल्याने लाखो रुपयांची पीक शेतातच कुजली आहेत.नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे त्वरित करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.शेतकऱ्यांचे सुमारे 3000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.वाळवा तालुक्यातील सुमारे 1700 हेक्टर आणि मिरज तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील सुमारे 2000 हेक्टरवरील शेतीपिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकासह घरांच्या पडझडीचेही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गावोगावी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांपुढे दुबार लावणीचे संकट…

वारणा नदीच्या पुराच्या पाण्याने बागणी भागातील अंदाजे 400 एकर शेती पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागणी भागात खोची रस्ता, पाढरमळा भाग, गणेश पाणंद भागातील शेतीला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. बागणीत प्रामुख्याने ऊस, सोयाबीन, भुईमूग ही पिके घेतली जातात. यावेळी उसाच्या आडसाल लावणी मोठ्या प्रमाणात केल्या असल्यामुळे पुराचे पाणी असेच राहिले तर लावणीबरोबर सोयाबीन व भुईमूग ही पिके कुजून बाद होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार लावणीचे व पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी…

कृष्णा नदीकाठावरील पूर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र, शेतीचे व घरांच्या पडझडीने अतोनात नुकसान झाले आहे.कृष्णा काठावरील 2700 हेक्टर क्षेत्र पूरबाधित बनले आहे.तर 35 घरांची पडझड झाली आहे. या पूरकाळात तब्बल आठ दिवस उभी पिके पाण्याखाली गेल्याने यात ऊस, भुईमूग, सोयाबीन, भात, केळी या पिकांचे नुकसान मोठे नुकसान झाले आहे.कृष्णा नदीकाठावरील बोरगाव, रेठरेहरणाक्ष, बहे, फार्णेवाडी, ताकारी, मसुचीवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, जुनेखेड, वाळवा या नदीकाठावरील गावातील शेतकऱ्यांची नदीकाठावर पूरपट्ट्यात 2700 हेक्टर शेती क्षेत्र येते.या क्षेत्रावर शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लावणी, जाणारे उसाचे पीक पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे शासनाने व पीकविमा कंपन्यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here